मुंबई: सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून उत्साहात सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशातील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, त्यात महाराष्ट्रातील सात मतदारसंघांचा समावेश आहे. विदर्भातील नागपूरसह सात मतदारसंघांमध्ये आज सकाळी अकरा वाजेपर्यंत 13.7 टक्के मतदान झाले. नितीन गडकरी, हंसराज अहिर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये आदी दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज यंत्रबंद होणार आहे. अनेक ठिकाणी इव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला होता. यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील 10 पैकी नागपूर, वर्धा, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांत आज गुरुवारी मतदान होत असून, एकूण 116 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 1 कोटी 30 लाख मतदार असून, एकूण 15 हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील 500 हून अधिक अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी नागपुरात सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री व भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील 220 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी टेकडी गणपतीचे दर्शन घेऊन मतदान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासोबत धरमपेठ मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा तालुक्यातील आपल्या मूळ गावी हरू येथे मतदान केले. जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगे हिने नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रात तांत्रिक अडचण आल्यामुळे 15 मिनिटे उशिरा मतदानाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले. गडचिरोली जिल्ह्यात अतिदुर्गम अशा वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात कोणतेही नुकसान झाले नाही. नागपुरातील भाजप उमेदवार नितीन गडकरींच्या फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आल्याचे दिसून आले. हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे. चंद्रपूर मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.89 टक्के, गडचिरोली-चिमुर मतदारसंघात 18.01 टक्के, वर्ध्यात 15.76 टक्के, भंडारा-गोंदिया मतदारसंघात 15.5 टक्के, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात 12.06 टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील 102 वर्षीय पुखराज बोथरा या सर्वात वयोवृद्ध मतदाराने मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील प्रहार पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांनी राजूरमध्ये मतदान केले.
गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजयी होणार -नितीन गडकरी
भारत हा सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. सर्व जगाचे लक्ष आपल्या निवडणुकीकडे आहे. मतदान केंद्राबाहेर सकाळपासून लोकांची गर्दी असून त्यांचा उत्साह कौतुकास्पद आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. पाच वर्षांपूर्वी जनतेने मला निवडून दिले होते. यावेळी मी माझी कामे घेऊन त्यांच्यासमोर गेलो. त्यांचे मला चांगले समर्थन मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी फार परिश्रम घेतले आहेत. मागच्या वेळेपेक्षा या निवडणुकीत मी जास्त मतांनी विजयी होणार याची खात्री आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.